जेरूसलम – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली असतानाच तिकडे इस्रायलमध्येही मोठे राजकीय वादळ उठले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात संसद बरखास्त होण्याची शक्यता होती. अखेर ती बरखास्त करण्यात आली आहे. चार वर्षांत पाचव्यांदा १ नोव्हेंबर रोजी देशात फेरनिवडणुका होणार आहेत. या काळात इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड हे कार्यवाहक पंतप्रधान राहतील. इस्रायलचे सर्वात कमी कालावधीचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्यानंतर ते हे पद भूषवणारे १४ वे व्यक्ती असतील.
बेनेट सरकार आधीच अल्पमतात होते आणि त्यांच्याकडे विरोधी पक्षांपेक्षा फक्त एक जागा जास्त होती. ६० खासदारांनी बेनेट सरकारच्या बाजूने, तर ५९ खासदारांनी विरोधात मतदान केले. अशातच यायर लॅपिड यांनीही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मग सरकार वाचवण्यासाठी आपले राजकीय भवितव्य पणाला लावण्याची तयारी नसल्यामुळे बेनेट यांनी आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांना न विचारता सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यायी पंतप्रधान यायर लॅपिड यांना विश्वासात घेऊन तो घोषित केला. मग खासदारांनीही संसद विसर्जित करण्याच्या बाजूने मतदान केले. अशाप्रकारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची आठवण करून देणारे इस्त्रायलमधील नफ्ताली बेनेट सरकार कोसळले. नफ्ताली बेनेट यांनी या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. पंतप्रधानपदी असताना त्यांची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरली.