लखनऊ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज, रविवारी मतदान होत आहे. या दरम्यान 12 जिल्ह्यांतील 61 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अमेठीचे राजा डॉ. संजय सिंह आणि प्रतापगढचे बाहुबली रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांच्यासह 692 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यांचे राजकीय भवितव्य सुमारे 2.24 कोटी मतदार ठरवणार आहेत.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की, पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण १४०३० मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या १२५० पर्यंत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मतदानाच्या ठिकाणी रॅम्प (दिव्यांगांच्या सोयीसाठी), स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा सुनिश्चित करण्यात आली आहे.