नवी दिल्ली- महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर ट्विट करत म्हटले की, नैतिक मूल्यांचे पालन करताना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी क्षणाचाही विलंब करू नये. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आचार्य प्रमोद कृष्णम हे ना काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहेत, ना हे काँग्रेसचे मत आहे. मात्र त्यानंतर या दोघांमध्ये ट्विटरवर वाद झाला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ट्विट करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा आदर राखत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन मराठा वैभव जपण्यासाठी नैतिक मूल्यांचे पालन करावे आणि या कामात दिरंगाई होता कामा नये. आचार्य यांच्या या ट्विटनंतर काँग्रेस पक्षावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर जयराम रमेश यांना या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे लागले. जयराम रमेश यांच्या ट्विटनंतर आचार्य प्रमोद कृष्णम आणि जयराम रमेश यांच्यात वाद झाला.आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. जयराम रमेश यांच्या ट्विटचा हवाला देत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे की, सत्ता तात्पुरती असते. मात्र मी कायम आहे, तरीही तुम्हाला काही अडचण असेल तर जयराम! एकूणच या ट्विटवरून काँग्रेसचे दोन मोठे नेते ट्विटरवर भिडल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी आचार्य प्रमोद काँग्रेसचा राजीनामा देणार की काय अशी अटकळ सुरू
झाली आहे.