संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

उद्धव ठाकरे प्रथमच शाखेत पोहोचले
शिवसैनिकांवर हल्ले खपवून घेणार नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेचे भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर आणि उपविभाग प्रमुख विजय कामतेकर यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी काल रात्री हल्ला केला. या घटनेची गंभीर दखल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आज शिवसेना भवनावरील बैठक संपल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावर असलेल्या 208 नंबरच्या शाखेला भेट दिली. शिवसेना शाखेला भेट देण्याची उद्धव ठाकरेंची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हल्ला झालेल्या शिवसैनिकांची विचारपूस केली आणि अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. जीवाशी येत असेल तर खपवून घेणार नाही. याआधी असे राजकारण कधी झाले नव्हते. पोलिसांकडून काही होणार नसेल तर हात वर करा. मग शिवसैनिक बघतील कसं रक्षण करायचे ते, शिवसैनिक रक्षण करायला समर्थ आहे. आपल्याकडे कर्तेकरविते उपमुख्यमंत्री आहेत. त्या उपमुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा, तुम्ही सांगा की आमच्याकडून तुमचे संरक्षण शक्य नाहीये. मग आमचे संरक्षण आम्ही करतो, असा खोचक टोला देखील ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
यावेळी लगावला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले की, ज्यांनी हल्ला केला त्यांच्या घरांना पोलिसांनी संरक्षण दिले. पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही. शिवसैनिक बबन गावकर आणि उपविभाग प्रमुख विजय कामतेकर हे आपल्या स्विफ्ट गाडीमधून काल घरी निघाले होते. त्यावेळी माझगाव येथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कामतेकर यांच्या कारवर तलवारीने हल्ला केला. त्यावेळी तिन्ही हल्लेखोरांनी मास्क घातला होता. परंतु, गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे कामतेकर व गावकर हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami