मुंबई – चांदोमामाचे सौंदर्य पाहायला सर्वांना आवडते. हा चांदोमामा पूर्ण किंवा आणखी मोठा दिसला की ते दृश्य अगदी डोळे दिपविणारे असते, मात्र असे दृश्य पुन्हा पुन्हा पाहता येत नाही. वर्षातून कमीवेळा असा अनुभव घेता येतो. योगायोगाने उद्याच आपल्याला आकाशात मोठ्या चंद्राचे दर्शन होणार आहे. उद्या, १४ जून रोजी पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसेल. या सुपरमूनला ‘रोझ मून’ असे नाव देण्यात आले आहे.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर तो आकाराने १४ टक्के मोठा आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसतो. अशा चंद्राला ‘सुपरमून’ म्हणतात. म्हणजेच जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लक्ष ७० हजार किलोमीटरच्या आत असते, तेव्हा सुपरमून दिसतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उद्या रात्री चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार ४३४ किलोमीटर अंतरावर जवळ येणार आहे. सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी चंद्राचे दर्शन होईल, मग सकाळी ६ वाजून २९ मिनिटांपर्यंत सुपरमून पाहता येईल. यानंतर पुढील सुपरमून आषाढ पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच बुधवार, १३ जुलै २०२२ रोजी दिसेल.
दरम्यान, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पृथ्वी आणि चंद्रामध्ये सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल. तर, ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठा सुपरमून पाहायला मिळेल. आता उद्या १४ जून रोजी रात्री दिसणारा सुपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा, असेही सांगण्यात आले आहे.