नवी दिल्ली- देशाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून त्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदावर यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली असून त्याला एमआयएमने पाठिंबा दिला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीला उपराष्ट्रपतीपदाच्या विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यासह शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आदी उपस्थित होते. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. बैठकीनंतर बोलताना इम्तियाज जलील यांनी म्हटले की, उपराष्ट्रपतीपदाच्या यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना एमआयएमने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अल्वा यांना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आम्ही उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी अल्वा यांना मतदान करु, असेही जलील यांनी सांगितले.