कोल्हापूर – खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या आंदोलनाची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरू लागली आहे. उद्या, शनिवार २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी गुरुवारी कोल्हापूरातून संयोजकांचे पथक भवानी मंडपातून मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, या उपोषणासाठी महाराष्ट्रातून येणार्या मराठा बांधवांना कुठेही अडवू करू नका, अशी विनंती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या प्रमुख न्याय व हक्कासाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. शिवाय छत्रपती घराण्यातील व्यक्ती उपोषणासाठी बसणार हीसुद्धा एक मोठी गोष्ट असणार आहे, त्यामुळे अनेकांचा पाठिंबा मिळत असून जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत, तालीम तसेच संस्थांनी पाठिंब्याचे पत्र संभाजीराजेंना पाठवले आहे. शिवाय या उपोषणासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी अटकाव करू नये, अशी विनंतीसुद्धा संभाजीराजेंनी केली आहे.