उरण – उरण तालुक्यात पाणथळ,दलदल आणि खारफुटीमुळे वन्यजीव प्राण्यांचा वावर वाढला आहे. विविध प्रजातींच्या पक्ष्यांसोबत आता दोन सोनेरी रंगाचे कोल्हे म्हणजेच गोल्डन जॅकल नजरेस पडल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पाणजे व डोंगरी गावाच्या शेजार पाणथळ परिसरात रविवारी सकाळी दोन कोल्हे जोडीने विहार करतांना दिसून आले आहेत.
रविवारी सकाळी या भागात मासेमारीसाठी गेलेल्या स्थानिक मच्छिमारांना प्रथम हे कोल्हे दिसले.त्यानंतर त्यांनी येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते पराग घरत यांना याची माहिती दिली.
सुरुवातीला खाद्याच्या शोधात एखादे कुत्रे आले असावे असे वाटले.मात्र अशी कुत्री नसतात हे लक्षात आल्यानंतर घरत यांनी झाडाच्या आड उभे राहून निरीक्षण केले असता घरत यांची खात्री पटली की हे सोनेरी कोल्हेच आहेत.उरण आणि जेएनपीटी बंदराच्या परिसरात सुरू असलेल्या औद्योगिकीकरणामुळे उरण मध्ये कोल्हे दिसेनासे झाले होते.मात्र आता पुन्हा त्यांचे दर्शन झाले.पराग घरत यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांची पिल्ले शेजारील गवतात असावीत अशी माहिती त्यांनी दिली.हा गोल्डन जॅकल हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत,नेपाळ आणि बांग्लादेश या देशांत आढळतो.काही दिवसांपूर्वी खारघर सेक्टर १७ येथील खाडीकिनारी देखील कोल्हे असल्याचे दिसून आले होते. या परिसरात तरस,कोल्हे, रानमांजर,रानडुक्कर,भेक ससे आणि मोर आढळून येत असतात.