उल्हासनगर- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होत आहेत. आज उल्हासनगर येथील शिवसेनेचे 18 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेत शिंदे गटात सामील झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील नगरसेवक, जिल्हापरिषद, पंचायत समितीतील अनेक पदाधिकारी आमच्यासोबत येत आहेत. उल्हासनगर येथील 18 नगरसेवक आज आमच्यातसोबत आले आहेत. नाशिक, दिंडोरी आणि नगरचेही नगरसेवक सहभागी झाल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, आमची बाळासाहेब ठाकरेेंचे विचार पुढे नेण्याची भुमिका आहे. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. या राज्याचा सेवक म्हणून मी काम करणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेचे 40 आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तेथेच आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर राज्यातील चित्र वेगळे असेल असे विधान केले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देत म्हटले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर केला आहे. पण राज्यात 50 आमदार आमच्या भूमिकेच्या बरोबर आहेत. राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सोबत येत आहेत. आम्हाला राजकारण करायचे नाही. राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच द्रोपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. त्या भूमिकेचे स्वागत आहे. तसेच आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी केले आहे, असेही शिंदे म्हणाले.