उल्हासनगर – उल्हासनगर शहरात रस्त्याच्या कडेला धूळ खात पडलेल्या पडीक वाहनांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.ही वाहने हटवण्यासाठी महापालिकेकडून वाहन मालकांना ४८ तासांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर ही वाहने जप्त करून महापालिका त्यांची विल्हेवाट लावणार आहे.
उल्हासनगर शहर हे अतिशय दाटीवाटीचे व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते.त्यातच शहरातल्या अनेक रस्त्यांच्या कडेला वापरात नसलेली अनेक वर्षांपासून धुळखात पडलेली वाहने लावून ठेवलेली आढळतात.या वाहनांमुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे उल्हासनगर महापालिकेच्या निदर्शनास आले.त्यामुळे वाहतूक विभाग आणि आरटीओ सोबत झालेल्या संयुक्त बैठकीत ही वाहने रस्त्यावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील अशा पडीक वाहनांवर ‘बेवारस वाहन’ असे स्टिकर्स लावले आहेत.यानंतर ही वाहने ४८ तासात तिथून हटवण्याचे आदेश महापालिकेने दिले असून त्यानंतरही ही वाहने तिथे आढळून आल्यास महापालिका ही वाहने जप्त केली जाणार आहेत.तसेच त्यानंतरही ही वाहने घेण्यासाठी मालक समोर न आल्यास त्यांची पालिकेकडून थेट विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.त्यामुळे वाहन मालकांनी पुढील ४८ तासात ही वाहने रस्त्यावरून हटवावीत आणि ज्या वाहनांची मुदत संपली असेल त्या वाहनांची विल्हेवाट लावावी,अन्यथा महापालिका या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले आहे.