मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या दर उसळला होता. सुवर्ण बाजार तेजीत असल्याने अनेकांनी त्यांच्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला असताना सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी एमसीएक्सवर एप्रिल वायदा सोन्याचा भाव 233 रुपयांनी घसरून 49,879 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, मार्च वायदा चांदीचा भाव 581 रुपयांनी घसरून 63,321 रुपये प्रतिकिलो झाला. इतर मौल्यवान धातूंमध्ये, स्पॉट सिल्व्हर 0.7 टक्के घसरून 23.79 डॉलर प्रति औंस, तर प्लॅटिनम 0.3 टक्के वाढून 1,070.29 डॉलरवर आला.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या- चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर, एप्रिल वायदा सोन्याचा भाव 0.46 टक्क्यांनी प्रति 10 ग्रॅमने घसरला, तर मार्च वायदा चांदीचा भाव 0.91 टक्क्यांनी घसरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्यासोबत युक्रेनच्या प्रश्नाबाबत झालेल्या शिखर परिषदेला तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर सोमवारी याचे पडसाद जागतिक बाजारावर पडल्याने सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे जाणकार सांगतात. स्पॉटच्या किमती 0.2 टक्क्यांनी घसरून 1,893.80 डॉलर प्रति औंसवर आल्या, 1,908 डॉलर या आठ महिन्यांच्या उच्चांकावरून त्यांच्यात घसरण झाली आहे.