नवी दिल्ली – गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असून सततच्या हल्ल्यांमुळे तेथील सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भितीदायक वातावरण आहे. युक्रेनमधील भारतीय नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच काल युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर आज २५० विद्यार्थी मायदेशी परतले.
आज पहाटे ३ वाजता २५० विद्यार्थी रोमानियाहून भारतात आले. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने हे विद्यार्थी भारतात परतले आहेत. ‘युक्रेनवर झालेल्या हल्ल्यांमुळे अनेक विद्यार्थी बंकरमध्ये राहत आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे. सरकारने आम्हाला वेळेवर बाहेर काढल्याबद्दल धन्यवाद’, अशा प्रतिक्रिया युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या.
दरम्यान, केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. ‘भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये’, असे त्यांना सांगण्यात आले आहे.