नवी दिल्ली – घरगुती सिलेंडरच्या दरवाढीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सिलेंडरच्या किंमतींची तुलना करताना त्यांनी म्हटले की, काँग्रेसच्या काळात 2014 पर्यंत सिलेंडरची किंमत 827 रुपये अनुदानासह 410 रुपये होती, तर 2022 मध्ये भाजपाच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये ती 999 रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडीदेखील शून्य आहे. आज एका सिलेंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलेंडरच्या किंमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे अन्नघटकांपासून ते सर्व वस्तू आणि सेवांसाठी अधिक किंमत मोजावी लागत असताना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या नव्या दरवाढीचे ओझे नागरिकांवर पडणार आहे. सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवली असून विनाअनुदानित सिलेंडरच्या 14.2 किलोग्रॅम सिलेंडरसाठी आता सध्याच्या 949.50 रुपयांऐवजी 999.50 रुपये मोजावे लागतील, असे सरकारी इंधन कंपन्यांनी म्हटले आहे.