मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना काल लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांचा एमआरआय करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. मात्र एमआरआयचे यंत्र अत्यंत संवेदनशील असल्याने त्या खोलीत कोणालाही कॅमेरा किंवा मोबाईल वापरता येत नाही. परंतु तरीही राणांच्या उपचारांची शुटिंग कशी काय झाली, असा सवाल आता शिवसेनेने लिलावती रुग्णालय प्रशासनाला केला आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी गेले. यावेळी शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद घेत रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याला परवानगी नसताना त्यादिवशी रुमपर्यंत कॅमेरा गेलाच कसा, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. तसेच नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. महत्त्वाचे म्हणजे नवनीत राणा यांनी स्पाँडिलायटीस असल्याचं सांगितलं होतं. हा त्रास असताना रुग्ण उशी वापरू शकत नाही. मात्र, राणांच्या व्हायरल फोटोत त्या उशी वापरताना दिसत आहेत. यावरून स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना आणि रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणे, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केले असेच दिसतेय, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. त्याचबरोबर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणतीही व्हीआयपी व्यक्ती असो, रुग्णालयाचे नियम सगळ्यांना सारखे असतात. रुग्णालयांचा कारभार हा चॅरिटी कमिशनच्या नियमांनुसार चालतो. त्यामुळे तुमचे रुग्णालय खासगी असले तरी त्याठिकाणी सरकारी नियमांचे पालन झालेच पाहिजे. आम्ही असले प्रकार रुग्णालयात खपवून घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावले.
दरम्यान, यावर रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपली चूक झाल्याचे मान्य केले. ही चूक गंभीर आहे, हे आम्हाला मान्य आहे पण नवनीत राणा यांचा फोटो काढण्यात आला तेव्हा एमआयआर मशीन सुरु नव्हती, असे स्पष्टीकरण संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.