मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता उमेदवारांना अयोमार्यादेत कितीही वेळा देता येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे. विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत ‘एमपीएससी’ मार्फत शासनाला शिफारस केली जाते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये परीक्षेसाठी उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या कमाल संधीबाबत मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार, खुल्या गटातील (अराखीव) उमेदवारांना कमाल 6 संधी, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 9 संधी, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र आता या मर्यादा लागू होणार नाहीत. वयोमर्यादेत असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या संधीची मर्यादा लागू होणार नाही. पूर्वीप्रमाणेच प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा उमेदवार देऊ शकतील.