पुणे : आज पुण्यात आमदार गोपिचंद पडळकर यांच्या उपस्थित एमपीएससी विद्यार्थ्यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र ज्या एपीएमसीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांनाच कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.दरम्यान यावेळी पडळरांनी एमपीएससीची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थांना मार्गदर्शन करताना एमपीएससी नाही झालात तरी सरपंचपद तुमची वाट बघत आहे, असा अजब सल्ला दिला.
पुण्यामध्ये एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी आज वास्तव कट्टा आणि अहम या संस्थांनी श्रमिक पत्रकार संघात कार्यक्रम आयोजित केला होता. गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि अभिमन्यू पवार,बच्चू कडू यांच्या उपस्थित सभा ठेवण्यात आली होती. मात्र यावेळी राजकीय कार्यकर्त्यांनीच मोठी गर्दी केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक होऊन घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी गोंधळ सुरुच ठेवला.यावेळी हे राज्यकर्ते चमकोगिरी करत असून आमच्या मुख्य भूमिका सरकारसमोर मांडत नाहीत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.यावेळी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी, ढकला ढकली करण्यात आली.आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाचीसुद्धा झाली.मात्र आयोजकांनी या गोंधळातच विद्यार्थांशी संवादाचा कार्यक्रम सुरु केला. दरम्यान, आजच्या कार्यक्रमाविरोधातील आणि नियुक्तीपत्र देण्याबाबतची याचिका एमपीएससीच्या 3 उमेदवारांनी हायकोर्टात दाखल केली आहे.