मुंबई – विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने जी त्रीसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे, तिचा अहवाल येत्या दोन दिवसात अपेक्षित आहे, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज सांगितले. दरम्यान २०१९ मध्ये प्रशिक्षण पूर्ण झालेल्या १८०० प्रशिकणार्थी त्वरित कामावर घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या वांद्रे येथील घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. सरकारने वेगवेगळ्या मार्गाने संप मिटवण्याचा प्रयत्न केला. पगारवाढीचे आमिष दाखवले. नोंदणीकृत संघटनांच्या प्रतिनिधीना पुढे करून संपत फुट पडण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचा उपाय म्हणून संपकरी कर्मचार्यांना निलंबित आणि पुढे बडतर्फ करण्याचीही प्रक्रिया सुरु केली. पण संपकरी एसटी कर्मचार्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट या संपामुळे सरकारच्याच अडचणीत वाढ झाली. त्यामुळे सरकार चिंतेत आहे. दरम्यान मालेगाव येथे उप प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले कि, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्या बाबत वारंवार आव्हान करण्यात येत आहे. परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने संपाबाबत निर्णय होऊ शकला नाही. आता त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आल्यानंतर तो न्यायालयात ठेवला जाईल. एसटी बंद ठेऊन कर्मचार्यांच्या मागण्या हक्क मिळू शकत नाहीत. एसटीचा संप नाहक लांबवण्यात आला आहे. असा आरोप करून ते पुढे म्हणाले कि संपकऱ्याना फितवल्यामुळेच एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र त्रिसदस्यीय समिती जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू. आणि ज्यांना तो निर्णय मान्य नसेल त्यांनी अपिलात जावे असे परब यांनी सांगितले. तर दुसरीकडे प्रशिक्षणार्थी उमेदवारही संतप्त आहेत. आणि त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
२०१९ साली प्रशिक्षणार्थी उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र एसटी महामंडळाने त्यांना अजून नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे या १८०० प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी, त्वरित कामावर घेण्याच्या मागणीसाठी आज आंदोलन केले. या आंदोलनात चालक, वाहक, सहाय्यक टेक्निशियन्स यांनी भाग घेतला या आंदोलनामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.