शिमला- हिमाचल प्रदेशातील बर्माना येथील एसीसी सिमेंट आणि दरलाघाट येथील अंबुजा सिमेंटचे कारखान बंद झाल्याने सुमारे 10 हजार कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहे. दोन्ही कंपन्यांनी कर्मचारी आणि कामगारांना आजपासून कामावर न येण्याचे आदेश जारी केले आहेत.
कंपन्यांनी मागणी कमी असल्याचे कारण देत कारखान्यांना टाळे ठोकले आहे. बर्माना येथील एसीसी प्लांटचे प्रमुख अमिताभ सिंह यांनी आदेश जारी करत परिस्थिती सुधारेपर्यंत व्यवस्थापनाने कर्मचार्यांना कामावर परत न येण्यास सांगितलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पुढील आदेशांची प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. सिमेंट प्लांट आणि वाहतूकदार यांच्यामध्ये वाद सुरु आहे. सिमेंट प्लांटचा वाहतूकदारांशी करारासंदर्भात वाद सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. या कारणामुळे सिमेंट प्लांट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे अंबुजा सिमेटच्या पाचही ट्रक युनियनने या प्रश्नाबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बर्माना कारखान्यातील टाळेबंदीचा परिणाम लहान दुकानदारांपासून ते ट्रक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या बर्माना ते स्वारघाटपर्यंतच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर होणार आहे. एसीसी सिमेंटच्या युनिटमध्येही 4000 ट्रक कार्यरत होते, त्यांच्यावर पोट भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही संकट कोसळलं आहे.