मुंबई – ‘लग्न’ हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर स्वप्न असते. साधारणपणे दोन व्यक्ती एकमेकांशी लग्न करून एकमेकांचे जोडीदार होतात. मात्र आता याबाबतही ऐकावं ते नवल, असे म्हणण्याची वेळ आली आहे. गुजरातच्या एका २४ वर्षीय तरुणीने चक्क स्वतःशीच लग्न करण्याचा घाट घातलाय. यासाठी तिने कपड्यांपासून दागिन्यांपर्यंतची सर्व जय्यत तयारी केली असून लग्नाचे आमंत्रण सर्वांना दिले आहे. क्षमा बिंदू असे या तरुणीचे नाव असून लग्नानंतर हनिमूनसाठी तिने गोव्याला जायचे नियोजन केले आहे.
क्षमा गुजरामधील बडोद्याची रहिवासी आहे. तिने एमएस विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदवी घेतली असून सध्या ती एका खासगी मनुष्यबळ आउटसोर्सिंग फर्ममध्ये काम करते. ११ जून रोजी क्षमाचे स्वतःशीच लग्न होणार आहे. विशेष म्हणजे तिच्या पालकांचा या लग्नाला पूर्ण पाठिंबा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्षमाला लहानपणापासून कधीच लग्न करण्याची इच्छा नव्हती. लग्न ही परंपरा तिला अजिबात आवडत नाही, मात्र तरीही नवरी होण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे तिने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. याला सोलोगॅमी असे म्हणतात. बहुधा हा देशातील पहिलाच स्व-विवाह किंवा सोलोगॅमीचा प्रकार असावा. स्व-विवाहामध्ये व्यक्ती स्वतःसाठी काहीही करण्यासाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्यासाठी वचनबद्ध असते.
‘लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. मी स्वतःच्याच प्रेमात आहे, म्हणून मी अशाप्रकारे लग्न करत आहे’, अशी भावना क्षमाने व्यक्त केली. ‘प्रत्येक स्त्रीला नवरी व्हायचे असते पण पत्नी नाही’, असे एका वेबसीरिजमधील अभिनेत्रीला म्हणताना क्षमाने ऐकले होते. त्यानंतर तिने स्व-विवाहाचा निर्णय घेतला. तिने सांगितले, ‘काहीजणांना वाटेल स्व-विवाह ही संकल्पना म्हणजे मूर्खपणा आहे. मात्र मला असे वाटते की कोणाशी लग्न करावे याचा अधिकार महिलांना असावा. यासाठी मी सर्वांना याची माहिती देत आहे. मला माझ्या आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा आहे. ते खुल्या विचारांचे आहेत. त्यांचा मला आशीर्वाद आहे.’ दरम्यान, गोत्री मंदिरात क्षमा स्वतःशी विवाहबद्ध होणार आहे.