मुंबई- मुंबईत गेले काही दिवस थंडी होती. मात्र सध्या हळूहळू गरमी वाढू लागली आहे. गरमी वाढू लागताच पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. 28 फेब्रुवारीपासून, भातसा येथील विद्युत स्थानकात काही तांत्रिक दोष झाल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 15 टक्के कपात करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही पाणीकपात लागू राहणार आहे.
पाणी कपात असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पाण्याचा योग्य असा साठा करून ठेवावा असे आवाहन पालिकेच्या जल विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबईला रोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी शेकडो लिटर पाण्याची गळती होते. यामुळे मुंबईकरांना आधीच कमी पाणी पुरवठा होतो. त्यातच उंच व डोंगरावरील भागातील नागरिकांना पाणी कमी वेळ व कमी दाबाने मिळते. आता पाणी कपात केल्याने मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी कपाटाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.