मेलबर्न – टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आजच्या सुपर 12 मधील एका महत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू स्टॉयनिस याने 18 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांच्या साहाय्याने नाबाद 59 धावा केल्या त्याला कर्णधार फिंच याने नाबाद 31 धावा करून चांगली साथ दिल्यामुळेच ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियावरचे स्पर्धेतून बाहेर जाण्याचे संकट टाळले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सुपर 12 च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. श्रीलंकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. दुसर्याच षटकात श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज मेंडिस 5 धावांवर बाद झाला. पण निसंका आणि डिसिल्वा यांनी तिसर्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. निशंकाने 40 तर डिसिल्वाने 26 धावा केल्या. तर असलंका याने नाबाद 38 धावा केल्या. पण नंतर मात्र श्रीलंकेची घसरगुंडी उडाली. भरवशाचा राजपक्षे याला स्टार्कने 7 धावांवर बाद केले. तर कर्णधार शनाका 3 धावा करून परतला. हेजलवूडने हंसरंगाचा अडसर 1 धावेवर दूर केला. मात्र करुणरत्नेने डेड ओव्हरमध्ये 14 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला 20 षटकात 6 बाद 157 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाचा स्टार्क, कमिन्स हेजलवूड अॅगर आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. दरम्यान ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेकडून मिळालेले 158 धावांचे लक्ष्य फारसे मोठे नव्हते. पण तीक्ष्णाने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला 11 धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मिशेल मार्शला डिसिल्वाने 18 धावांवर बाद केले. ऑस्ट्रलियाने 9 षटकात 2 बाद 60 धावा केल्या. आणि आपली बाजू मजबूत केली. दरम्यान मॅक्सवेल आणि कर्णधार फिंच यांची जोडी जमलेली असतानाच मॅक्सवेल 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या स्टॉयनिसने तुफान फटकेबाजी करीत 18 चेंडूत 59 धावा केल्या. आणि ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवून दिला.