संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

ऑस्ट्रेलियामध्ये दुमदुमणार ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्या काळी झालेल्या लढाया, त्यांची कीर्ती, महती..ऑस्ट्रेलियामध्ये सुमधुर नवगीतांच्या माध्यमातून दुमदुमणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘सईशा फाऊंडेशन मुंबई’ निर्मित व प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’च्या सभासदांसाठी तसेच पर्थ, मेलबर्न, ब्रिस्बेन, सिडनी, अडलेड, कॅनबेरा व ऑस्ट्रेलिया टाईमझोनशी जवळपास असणाऱ्या देशांमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’च्या युट्युब पेजवर सादर करण्यात येणार आहे. तसेच युके, यूएसए, कॅनडा, न्यूझीलँड, सिंगापूर, मलेशिया, दुबई, अबूधाबी, नेदरलँड, जर्मनी आणि मॉरिशस येथील मराठी बांधवांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

शिवजन्म, स्वराज्याचे तोरण, वीर बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगड युद्ध, महाराजांची आग्रा भेट, स्वराज्याचे आरमार, शिवराज्याभिषेक आणि अशी अनेक स्फूर्तिदायी गीते सादर होणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीनिमित्त स्थित आपल्या देशातील मराठी जनांनी एकत्र येऊन ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’ संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवाबरोबरच मराठमोळी संस्कृती जपावी तसेच सगळे ज्ञान, वारसा पुढच्या पिढीला मिळावा हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. “गेल्या दोन वर्षाच्या परिस्थितीमुळे मोठ्या स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करू शकलो नाही, पण म्हणून उत्साह कमी झालेला नाही.

आपला देश, महाराष्ट्र आणि संस्कृती बद्दलचं प्रेम तसंच आहे आणि वाढत आहे. पार्कमध्ये येऊन आम्ही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करतो. यंदा सादर होणारा संगीत शिवस्वराज्यगाथा कार्यक्रम प्रत्येकासाठी पर्वणीच ठरेल.” असे ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’चे अध्यक्ष संतोष काशीद म्हणाले. ही संस्था आपल्या देशातील पूरग्रस्त, वृद्धाश्रम, रुग्णालये यांना मदतीचा हात देत सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. 

”आपल्या मायभूमीपासून दूर आपली माणसे आहेत तरीही इथली ओढ आणि आपल्या परंपरेचं जतन ही सर्व मंडळी करत आहेत. याचं कौतुक वाटतं” असा आनंद ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’चे लेखक अनिल नलावडे यांनी व्यक्त केला.  

”शिवचरित्रातून राष्ट्रनिर्मिती हा या ऐतिहासिक संगीतमय कार्यक्रमाचा ध्यास आहे. आम्हाला आनंद आहे की ४२ नवगीतांमधून साकारलेले धगधगते शिवचरित्र ऑस्ट्रेलिया येथे पहिल्यादांच होत आहे.” असे कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका, निवेदिका पद्मश्री राव म्हणाल्या. गेल्या १२ वर्षांपासून ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’चा यशस्वी प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रासह देशविदेशात ठिकठिकाणी याचे सादरीकरण होत आहे. लवकरच मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून रसिकांना याचा प्रत्यक्ष आनंद घेता येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami