मुंबई, 13 जून : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला पराभूत केल्यानंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी ओबीसी आरक्षणाच्या इम्पेरिकल डेटा गोळा करण्यावरून गंभीर आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारकडून इम्पेरिकल डेटा गोळा केला जात आहे. पण, ओबीसी आरक्षण इम्पेरिकल डेटा तयार करण्याची पध्दत चुकीची आहे. त्याचा ओबीसी समाजाला फटका बसू शकतो. ओबीसी संख्या कमी झाली असं या सर्व्हेत दाखवलं जातंय, असा आक्षेप फडणवीसांनी घेतला आहे.
त्यानंतर वडेट्टीवार यांनी याबाबत खुलासा केला आहे.’देवेंद्र फडणवीस यांनी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले ते काही अंशी खरेही आहे. राज्य सरकारला याची कल्पना होती. आडनावावरून जो इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरू होते. आता त्यात सुधारणा केल्या जाणार असून आडनाव घेताना जात व प्रवर्ग हा संबंधित ग्रामपंचायतीकडून तपासणी केली जाईल. ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान सहन केले जाणार नाही आणि होऊ पण दिले जाणार नाही. पुढच्या 10 दिवसांत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण करून न्यायालयात सादर केले जाईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.