औरंगाबाद – जिल्ह्यातील चिकलठाणा पोलीस ठाणे हद्दीतील गंधेली शिवारातील निर्जन ठिकाणी एका उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याने कारमध्ये बसलेल्या जोडप्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. कारमध्ये मृत्यू झालेले जोडपे हे प्रेमी युगुल असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलिसांनी सांगितले की, काल दुपारी साधारण दोन वाजण्याच्या सुमारास एका इसमाने गंधेली शिवारात स्फोटाचा आवाज ऐकला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना त्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये एक मृत महिला आणि मृत पुरुष अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आले. पोलीस तपासात यातील मृत पुरुषाचे नाव रोहिदास गंगाधर अहेर असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेची मात्र ओळख अद्याप पटू शकलेली नाही. ही कार सुरू असताना सिलिंडरच्या टाकीचा स्फोट झाला असावा. मृतांच्या शररीरावर मोठ्या प्रमाणावर व्रणही आढळून आले आहेत. फोरेन्सिक आणि ऑटोप्सी अहवालानंतर अधिक माहिती पुढे येऊ शकेल असे पोलिसांचे म्हणणे आहे.