औरंगाबादः – एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी एका पत्राद्वारे पक्षाची जिल्हा आणि शहराची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र नुपूर शर्मा वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनाला गालबोट लागल्यामुळे खासदारांकडून हि कारवाई होत असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष समीर आणि शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी आपले पद सोडून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आदेश खासदारांनी दिले. मात्र पत्रात या दोघांनीही आतापर्यंत पक्षासाठी केलेल्या कामाची स्तुतीही करण्यात आली आहे. तसेच पुढील सूचनेपर्यंत जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करावे, अशी सूचना खा. जलील यांनी केली आहे. खासदार जलील यांच्या या कारवाईनंतर एमआयएम आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अचानकपणे कार्यकारिणी बरखास्त करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, खासदारांच्या या निर्णयानंतर शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष जे देईल ते काम करत राहू, आमची कोणतीही नाराजी नाही, असे शहराध्यक्ष म्हणाले. तर जिल्हाध्यक्षांकडून कोणतीही प्रतिक्रिया जाहीर झालेली नाही. मात्र भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयासमोर एमआयएमच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर शांततेत आंदोलन सुरु असतानाच एका जमावाकडून दगडफेक, धक्काबुक्कीही झाली.अखेर पोलीस आयुक्त आणि खासदार जलील यांनी रस्त्यावर उतरून जमावाला शांत केले. या आंदोलनाला गालबोट लागल्यामुळे खासदारांनी ही कारवाई केली असावी अशी चर्चा देखील एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.