औरंगाबाद – राज्यात गोवरने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असताना आता दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे.जिल्ह्यात गोवरचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई,भिवंडी,मालेगावनंतर आता औरंगाबाद जिल्ह्यातही गोवर आजाराने शिरकाव केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दोन बालकांना गोवरची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील एका ७ वर्षीय बालकाचा आणि सिल्लोड येथील ४ वर्षे ११ महिन्यांचा बालिकेचा समावेश आहे.अजूनही आठ रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागासह सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली.औरंगाबाद शहरातील नाहिदनगर येथील ७ वर्षीय मुलाला गोवरची लागण झाली आहे.
या मुलाला १० नोव्हेंबर रोजी अंगावर पुरळची लक्षणे आढळली होती. सिल्लोड येथील बालिकेला १३ नोव्हेंबर रोजी लक्षणे आढळली होती.
आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात फक्त गोवर संशयित रुग्ण आढळून येत होते.मात्र,आता दोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.पालिका आणि ग्रामीण भागातील आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.तसेच संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहे.तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.