मुंबई -रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे तसेच कंत्राटदार सक्षम नसल्याने रखडलेली कामे याबाबतचा मुद्दा आज विधान परिषदेत चर्चेला आला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल असे सरकारकडून आश्वासन देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे कंत्राटदार सक्षम नसल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत, याकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.
संभाजी नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शरणापूर ते साजापूर- करोडीपर्यंत असलेल्या ६ किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ८ वर्षांत तीन वेळा निधी उपलब्ध करूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याच्या २८ कोटी रुपयांच्या कामासाठी ७ डिसेंबर २०२२ पर्यंत निविदा मागविण्यात आल्या. चार कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त झाल्या तरी निविदा उघडण्यात आल्या नाहीत. असेही यावेळी दानवे यांनी सांगितले