कर्जत – भारतीय संघातील माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव ही आता कर्जतचे रहिवाशी बनणार आहेत.ते कर्जतकर म्हणुन ओळखले जाऊ शकतात.कारण कपिल देव यांनी नुकतीच कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथे तब्बल २५ एकर जमीन खरेदी केली आहे.काल बुधवारी ते कर्जतमध्ये या जमिनीच्या दस्त नोंदणीसाठी आले होते.
कपिल देव यांच्याकडून त्या जमिनीचे दस्त नेरळ येथील सहनिबंधक कार्यालयात बुधवारी नोंदविण्यात आले. यावेळी येथील सन्मान हॉटेल परिसरात त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.दुपारी काळ्या रंगाच्या गाडीतून कपिल देव नेरळ येथे सहनिबंधक कार्यालयात आले होते.त्यांच्या दस्त नोंदणीचा नंबर आल्यानंतरच ते गाडीतून उतरले आणि त्यांना पाहताच चाहत्यांनी त्यांना गराडा घातला.चाहत्यांच्या गराड्यातून कसेबसे बाहेर पडत ते दस्त नोंदणी कार्यालयात गेले.काम आटोपून बाहेर येईपर्यंत त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.सहनिबंधक कार्यलयात पोहोचल्यानंतर उपनिबंधक महेंद्र भगत यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
त्यावेळी त्यांचे वकील ॲड.भूपेश पेमारे, तसेच कार्यालयीन कर्मचारी सुनील लगड, मंगेश तिठे, कुणाल दळवी,सारिका गायकवाड,
विद्या जाधव यांनी सर्वांनी फोटो काढून घेतले.तर कार्यालयात उपस्थित अनेक वकिलांनाही कपिल देव यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.जेमतेम १५ मिनिटांत ते दस्त नोंदवून निघून गेले.