कराची – पाकिस्तानातील कराचीमध्ये पोलीस मुख्यालयावर हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. पोलीस मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून हा गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी पोलीस मुख्यालयात पोहोचताच वाहने पार्क केल्यानंतर हँड ग्रेनेडही फेकले. या घटनेत काहींचा मृत्यू झाला तर, काही जखमी झाले. मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
पाकिस्तानचे हे पोलिस मुख्यालय कराची शहरातील शरिया फैसल येथे आहे. या इमारतीमध्ये ८ ते १० दहशतवाद्यांनी घुसून अंधाधुंद गोळीबार केला. पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या दरम्यान, पुरेसा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला व दहशतवाद्यांना घेरण्यात आले. यात ५ दहशदवादी ठार करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, ४ जणांचा मृत्यू झाला तर, १० जण जखमी झाले. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या हल्ल्याच्या जबाबदारी स्वीकारली.