कराड – एसटी कामगाराच्या प्रश्नावर आघाडी सरकारकडून कोर्टात वेळकाढूपणा सुरु असून दुसरीकडे महामंडळाकडून आंदोलन करणाऱ्या कामगारांवर कडक कारवाईचा बडगा सुरु आहे. मानसिक दबावाखाली एसटी कर्मचारी असून कराड एसटी आगारातील उपोषणात सहभागी आणखीन एका बस चालकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आटके येथील बाळकृष्ण बापूसो पाटील (वय- 42) यांचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. एसटी कामगारांच्या आंदोलनात ९० पेक्षा जास्त कामगारांना जीव गमवावा लागला आहे.
82 हजार 498 कर्मचाऱ्यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत. तर 28 हजार 93 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. 25 हजार चालक आणि 20 हजार वाहक संपात सहभागी असल्याने एसटीची वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. आतापर्यंत 9 हजार 251 कर्मचारी बडतर्फ करण्यात आलेत, तर 11 हजार 24 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत.
एसटी विलीनीकरणाबाबत त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने काल मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. विलिनीकरणाचा एक मुद्दा सोडला तर इतर सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत, असे राज्य सरकारने सांगितले. दरम्यान, हा अहवाल प्रतिवाद्यांना देण्याकरता मंत्रिमंडळाची मंजूरी आवश्यक आहे. कामगारांनी आता कामवर परतावे. खेडेगावात लोकांचे अतोनात हाल होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणांचे मोठ नुकसान होत आहे. मुद्दा न्यायप्रविष्ट असताना कामावर न परतण्याचे धोरण चुकीचे आहे, असे एस.टी. महामंडळाने हायकोर्टात सांगितले.