अहमदनगर- कर्जत व जामखेड तालुक्यातील जलसंधारणाची मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे निविदा प्रक्रिया झालेल्या असतानाही थांबविण्यात आली आहेत. नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील कामांची स्थगिती उठविण्यात आली असली तरी या कामाचे श्रेय घेता यावे यासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे ही कामे रोखून धरण्यासाठी सरकार दरबारी चकरा मारत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
नवीन सरकार आल्यावर राज्यातील अनेक कामांना स्थगिती देण्यात आली. अनेक कामे रद्द करण्यात आली. स्थगिती देण्यात आलेल्या कामांमध्ये नगर जिल्ह्यातील आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील कामांचाही समावेश होता. मात्र, अलीकडेच बर्याच ठिकाणची स्थगिती उठविण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यांतील कामांवरील स्थगिती उठविण्यात आली. मात्र, कर्जत जामखेड मतदारसंघातील कामांवरील स्थगिती कायम आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आम्हाला सहकार्याची भूमिका आहे. मात्र, आमदार राम शिंदे शासन दरबारी उंबरठे झिजवत आहेत. कर्जत-जामखेडमधील सगळ्याच कामांना स्थगिती द्या, मला त्याचे श्रेय घ्यायचे आहे, असे म्हणत आहेत. त्यामुळे विकासाला बाधा निर्माण होत आहे. असे गलिच्छ राजकारण थांबवण्याची गरज आहे. अन्यथा कर्जत-जामखेडची जनता शांत बसणार नाही, असा इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.