कर्जत – कर्जत तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढत चालला आहे. तालुक्यातील शिरसे गावातील एका शेतकर्याच्या गाईवर अशाच एका बिबट्याने हल्ला केल्याने त्यात गाईचा मृत्यू झाला. शेतकरी निखिल दत्तात्रय देशमुख यांच्या मालकीची ही मृत गाय होती.दरम्यान, नागरिकांनी बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन कर्जत पश्चिम वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर यांनी केले आहे.
शेतकरी निखिल देशमुख यांनी आपल्या जवळील असणारे चार गाई व एक बैल अशा पाच गुरांना जंगलात चरण्यास सोडले असता संध्याकाळी पाच गुरांपैकी चार गुरे घरी आली व एक गाय आली नाही, म्हणून निखिल देशमुख गाईला शोधण्यासाठी त्याचदिवशी डोंगरावरील जंगलात गेले.जंगलात गाईचा शोध घेत असता एका ठिकाणी त्यांची मृतावस्थेत आढळून आली. तिच्यावर वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याचे तिच्या मृतदेहावरून स्पष्ट होत होते. देशमुख यांनी लगेच कर्जत वनविभागाला झालेली घटना कळवली असता वनविभागाचे वनपाल रघुनाथ कोकाटे हे आपल्या काही वनकर्मचार्यांना बरोबर घेऊन घटनास्थळी पोहोचले.त्यावेळी त्यांना मृत गाईच्या शेजारी वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसून आले.हे पायाचे ठसे बिबट्या जातीच्या वाघाचे असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर पंचनामा करून त्यात गाईवर बिबट्यानेच हल्ला केल्याचे नमूद करण्यात आले.त्यावेळी ग्रामस्थांनी आपली लहान मुले,पाळीव प्राणी,रात्रीच्या वेळी एकटे सोडू नये,तसेच रात्रीच्या वेळी फटाके लाऊन आवाज करीत रहा,जेणे करून फटाक्यांच्या आवाजाने जंगलातील हिंस्र प्राणी गावापासून दूर राहतील असे सतर्क राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर यांनी केले आहे.