कोल्हापूर : कळंबा कारागृहात झोपेत असलेला कैदी सतपालसिंग जोगिंदरसिंग कोठाडा याच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने संशयित आरोपी गणेश लक्ष्मण गायकवाड याची सोमवारी पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केली. कारागृहात घडलेल्या खुनाच्या घटनेबद्दल ड्यूटीवरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात रविवारी पहाटे कैद्यानेच एका कैदी मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्यामुळे खळबळ उडाली होती. चेष्टामस्करी केल्याच्या रागातून जीवघेणा हल्ला करणारा कैदी गणेश गायकवाड याची कारागृह प्रशासनाने तातडीने सोमवारी पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केली. तसेच खुनाच्या घटनेची स्वतंत्र समितीकडून चौकशी केली. मृत कैद्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी इन कॅमेरा करण्यात आली. चार सदस्यीय समितीने ड्यूटीवरील चार रक्षक, दोन वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि १० कैद्यांची चौकशी करून २७ पानांचा अहवाल कारागृह अधीक्षक प्रभारी पांडुरंग भुसारी यांच्याकडे सोपवण्यात आला.