नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी मंत्री पियुष गोयल यांना निवेदन सादर केले होते. मात्र प्रश्न सुटला नाही. आता याकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी लक्ष केंद्रित केले असून, ते केंद्राला पत्र लिहिणार आहेत.
कांदा विक्रीतून उत्पादन आणि वाहतुकीचा खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर उतरून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा, यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, केंद्राने बाजार हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी करावा, असे पत्र राज्य सरकार केंद्राला पाठवणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांशी चर्चा करणार आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री भुसे यांनी दिली. जिल्हा परिषदेतर्फे आयोजित ‘मिशन भगीरथ प्रयास’ या उपक्रमाच्या प्रारंभानंतर पालकमंत्री भुसे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.