चाकण :- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या आवकेत किंचित घट होऊनही दरात घसरण झाली. कोबी, वांगी, फ्लॉवर, मेथी व शेवग्याची उच्चांकी आवक झाली. बटाट्याची आवक व भाव स्थिर राहिले. फळभाज्यांच्या बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटूनही भावात घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर व पालक भाजीची आवक वाढून दरात मोठी घसरण झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व म्हशींच्या संख्येत घट झाली. तर शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल ५ कोटी १५ लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १०,५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने घटून भावात २०० रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव १ हजार ६०० रुपयांवरून १,४०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १ हजार ७५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भाव १,४०० रुपयांवर स्थिरावले. जळगाव भुईमुग शेंगांची एकूण आवक ८ क्विंटल झाली. या शेंगांना ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५ क्विंलने वाढली व कमाल भाव ५ हजार रुपयांवर स्थिरावला.