काबुल- अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील मशिदीजवळ शुक्रवारी मोटारीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यात 8 जण ठार झाले असून 18 जण जबर जखमी झाले आहेत. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना स्फोटात किमान 20 नागरिक ठार झाल्याचा दावा केला आहे.
काबुल शहराच्या पश्चिम भागातील शिया बहुल सर-ए-करेज भागातील मशिदीजवळ शुक्रवारी एक मोटार उभी होती. त्यात बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 8 जण ठार झाले आणि 18 जण जखमी झाले. त्यातील अनेकांची प्रकृती चिंत्ताजनक आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे तालिबानचे काबुल शहराचे पोलीस प्रवक्ते खालिद जादरान यांनी सांगितले. दरम्यान या स्फोटाची जबाबदारी इसिसने घेतली. स्फोटात किमान 20 जण ठार झाले. मात्र तालिबान पोलीस मृतांचा आकडा लपवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तालिबाने अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर इसिसने तेथे दहशतवादी कारवाया सुरू केल्या. त्यात ते प्रामुख्याने शिया या अल्पसंख्यांक मुस्लिमांना लक्ष्य करत आहेत.