मुंबई :- म्हाडा प्राधिकरणाने पुढाकार घेऊन, ग्रँट रोड परिसरातील कामाठीपुरामध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांसाठी खासगी विकासकाकडून समूह पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करावा. तसेच म्हाडाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबवून रहिवाशांना विस्तृत परियोजना अहवालाच्या नियमानुसार सरसकट ५०८ चौरस फुटांचे घर द्यावे, अशी मागणी कामाठीपुरा विकास समितीने म्हाडाकडे केली.
कामाठीपुरा विकास समितीची सर्वसाधारण बैठक भावनाबागमधील तेलगु पद्मशाली हॉलमध्ये नुकतीच झाली. या बैठकीत कामाठीपुऱयाच्या पुनर्विकासासाठी गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी,समितीचे कार्याध्यक्ष सुनील कदम, म्हाडा, पालिका अधिकारी आदी उपस्थित होते. सर्व राजकीय पक्षांचा या पुनर्विकास प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. झेड दक्षिण मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कामाठीपुराचा पुनर्विकास झाला तर त्यामुळे रहिवाशांना सुरक्षित घरे तर मिळतीलच, पण त्याचबरोबर उर्वरित जागेवर म्हाडाला परवडणारी घरेही उपलब्ध करून देता येणार आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात सर्वसामान्यांच्या घरांचा प्रश्नही सुटेल असे स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.