गुना- गुनाच्या आरोनमध्ये, शिकारीसोबत झालेल्या चकमकीत तीन पोलिसांचा मृत्यू झाला. पोलीस पथकातील चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान घडली आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात शिकारी नौशाद मेवाती ठार झाला.
या घटनेबाबत मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. ग्वाल्हेरचे आयजी अनिल शर्मा घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. मध्य प्रदेश सरकारने शहीद झालेल्या तीन पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, दोषींची ओळख पटली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
एसपी राजीव कुमार मिश्रा यांनी सांगितले की, सागा बरखेडा येथून शिकारी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांच्या घेरावासाठी 3-4 पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली होती. जंगलात चार -पाच जण बाईकवर जाताना दिसले. पोलिसांनी घेराव घातल्यावर त्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले.
यामध्ये उपनिरीक्षक राजकुमार जाटव, हवालदार नीरज भार्गव आणि कॉन्स्टेबल संतराम यांचा जागीच मृत्यू झाला. शिकार्यांकडून पाच हरण आणि एका मोराचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत.