जम्मू – दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अमशीपोरा गावात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच चकमक झालेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि काही आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त करण्यात आले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी दिली.
आज सकाळी अमशीपोरा गावात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली. गावाला वेढा घातल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी घरांची झडती घेत असताना संशयित ठिकाणी लपलेल्या या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्यूत्तर देण्यापूर्वी सुरक्षा दलाने त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. मात्र त्यांनी गोळीबार सुरुच ठेवला. तेव्हा सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांत या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. कंठस्नान करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी स्थानिक असून त्यांचे संबंध लष्कर-ए-तोयबाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. मुज्जमिल आणि आबिद अशी त्यांची नावे असल्याचे समजते आहे. दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे, दारूगोळा याशिवाय आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे.