बेळगाव – महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील किटवाड धबधब्यात ४ तरुणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एका तरुणीला वाचवण्यात यश आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशिया मोहम्मद गौस मुजावर (१७), खुदुशसिया हसन पटेल (२०), रुख्सार युसुफ भिस्ती (२०) आणि तसमिया अशपाक चिश्ती (२०) अशी मृत तरुणींची नावे आहेत.
बेळगावच्या खंजीरे गल्लीतील ४० ते ५० मुस्लिम तरुणी सहलीसाठी किटवाड धबधब्यावर गेल्या होत्या. तिथे एक तरुणी धबधब्याच्या डोहात आंघोळीसाठी उतरली. पाणी खोल असल्याने ती बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी दुसऱ्या तरुणीने हात दिला. पण तीही पाण्यात पडली. अशाप्रकारे एकापाठोपाठ एक ५ तरुणी डोहात बुडाल्या. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्यांना बाहेर काढले. मात्र यात ४ तरुणींचा मृत्यू झाला होता. एकीला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. तिला बेळगावमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेने किटवाड धबधब्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.