नवी दिल्ली – सरत्या जानेवारी महिन्यात घाऊक महागाई निर्देशांकात घट नोंदविण्यात आली असली तरी या जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई मात्र वाढली आहे. किरकोळ महागाई निर्देशांकाचे आकडे व्यापार मंत्रालयाने जारी केले आहेत. त्यात डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई निर्देशांक ५.७२ टक्के तर जानेवारी महिन्यात ६.५२ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. ही जानेवारीची आकडेवारी महागाई वाढण्याचे संकेत देत आहेत.
याआधी भारतात महागाई कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यासाठी आरबीआय वारंवार रेपोरेटमध्ये वाढ करत आहे. तसेच अन्य बँकांनीही मुदत ठेवींवर जास्तीत जास्त व्याज देण्याची घोषणा आपल्या परीने केली होती. दरम्यान, किरकोळ महागाई बरोबर अन्नधान्याची महागाई जानेवारी महिन्यात वाढल्याचे दिसून येते. डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई ४.१९ टक्के तर जानेवारीत ५.९४ टक्के होती.