मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने आज सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती रुग्णालयात एका बेडवर झोपलेली दिसत आहे, तिच्या बाजूला पाठमोरा रणबीर बसला असून जवळच्या मॉनिटरच्या स्क्रिनवर हार्ट इमोजी दिसत आहे. आपल्या पोटातील बाळाची वैद्यकीय तपासणी करतानाचा हा फोटो शेअर करून आलियाने आपण आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर रणबीर आणि आलियावर प्रेमाचा जणू वर्षाव पाहायला मिळाला.
या जोडप्याने १४ एप्रिल रोजी त्यांच्या वांद्रे येथील घरी साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली होती. या सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी लगेच गोड बातमी समोर आल्याने आलिया लग्नाआधीच गरोदर होती का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे आलिया-रणबीरच्या गूडन्यूजवर प्रतिक्रिया देताना होणाऱ्या आजी म्हणजेच आलियाची आई सोनी राझदान यांनीही म्हटले की, ‘ही आनंदाची बातमी कळल्यानंतर आता नव्या पाहुण्याची वाट पाहणे खूप कठीण जातेय. ते चिमुकलं बाळ मी कधी माझ्या हातात घेते असे झाले आहे.’
दरम्यान, लग्नानंतर आलिया आणि रणबीरने कामातून अजिबात विश्रांती घेतली नव्हती. दोघेही आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण आणि प्रमोशनच्या कामांमध्ये व्यस्त झाले होते.