मुंबई – पावसाला आता कुठे सुरुवात झाली, तर मुंबईत झाडे, घरे, इमारतींचा भाग कोसळण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. मुंबईतील कुर्ला परिसर काल रात्री अशाच एका दुर्घटनेने हादरला. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास एक चार मजली इमारत कोसळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. कुर्ला पूर्व भागातील शिवसृष्टी रोड येथे नाईक नगर सोसायटीतील एक इमारत कोसळली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आणि एनडीआरएफ जवानांची तुकडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर बचावकार्य सुरू होते. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार मोडकळीस आलेल्या इमारतींची ही वसाहत असून त्यांना पाच ते सहा वर्षांपूर्वीच रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. तरीही रहिवासी तिथेच राहत होते. सोमवारी रात्री यातील एक इमारत कोसळली. अग्निशमन दल येण्यापूर्वीच पाच ते सहा जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत आणि जखमींना रुग्णालयात पाठवले जात आहे. तसेच उर्वरित तीन इमारतींमधील भाडेकरूंना मंगळवारी सकाळी मुंबई महानगरपालिका स्थलांतरित करणार असल्याचेही मोरजकर यांनी सांगितले होते. त्या म्हणाल्या की, महानगरपालिकेने भाडेकरूंना इमारती रिकाम्या करण्याचा पुरेसा इशारा दिला होता.