कुशीनगर – उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे हळदीच्या कार्यक्रमात मृत्युने अक्षरशः थैमान घातले. बुधवारी रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत १३ महिलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यात ५ ते १५ वर्षे वयोगटातील ९ मुलींचा समावेश आहे. हळदीच्या कार्यक्रमात पूजा करताना जाळी तुटून या महिला विहिरीत पडल्या. त्यानंतर दीड तास अनेकदा फोन करूनही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे या १३ जणींचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.
कुशीनगर जिल्ह्यातील नेबुओ नौरंगीया येथील स्कूल टोला येथे लग्न समारंभ होता. त्यात बुधवारी रात्री हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात लग्नमंडपा शेजारच्या विहिरीतील लोखंडी जाळीवर बसून महिला पूजा करत होत्या. तेथे गर्दी झाल्याने वजनाने जाळी तुटली आणि १३ जणी विहिरीत पडल्या. या घटनेमुळे तेथे गोंधळ उडाला. नागरिकांनी सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केले. सुमारे दीड तास ते फोन करत होते. परंतु रुग्णवाहिका आली नाही. नागरिकांनी विहिरीत पडलेल्या महिलांना बाहेर काढले. मात्र त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु त्या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मरण पावल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. त्यामुळे महिलांचा मृत्यू झाला, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यातील अनेक महिलांना पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यु झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.