मुंबई -आजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद आता भाजपाकडे गेले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज अध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे रामदास तडस यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्याचा आरोप होत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला होता.
१९५३ मध्ये कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये अधिवेशन भरविताना कुस्तीमध्ये कंपन्या आल्या. ते पैसे देत गेले. त्यातून पुढे आर्थिक गैरव्यवहार झाले. साताऱ्यातील स्पर्धेच्या वेळी राज्य सरकारकडून मिळालेल्या पैशांमध्ये खोटी बिले काढून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. शिवाय काही वयोगटांतील स्पर्धादेखील झाल्या नाहीत. त्यामुळे कुस्तीपटूंचे नुकसान झाले. याविरोधात अनेकांनी आवाज उठविला, उपोषणही केले. ही बाब पवार साहेबांच्याही कानावर टाकण्यात आली. दुर्दैवाने व्यस्ततेमुळे ते याकडे लक्ष देऊ शकले नाही. यासंदर्भात महासंघाकडे तक्रार गेल्यानंतर अखेर राज्य संघटना बरखास्त करून सर्व कारभार तीन सदस्यीय हंगामी समितीकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.