ओटावा – कॅनडामध्ये ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर आणीबाणी लागू करण्यात आली होती. लसीकरणासंदर्भात निर्बंधाविरोधात ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आणीबाणी लागू केली होती. आता ट्रक चालकांचे आंदोलन संपल्यानंतर आणीबाणी मागे घेण्यात आली आहे.पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले आहे की, आता देशात आपत्कालीन परिस्थिती नाही. त्यामुळे आणीबाणी कायद्याचा अवलंब करणे थांबवले जात आहे.
कॅनडातील परिस्थिती सध्या गंभीर आहे मात्र आंदोलन मागे घेतल्याने स्थिती सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ट्रक चालकांनी कोरोनाशी संबंधित निर्बंध हटवण्याची मागणी केली होती. लसीकरण बंधनकारक केल्यानंतर संताप व्यक्त करत ट्रक चालकांनी आंदोलन पुकारले होते. हजारो ट्रक चालकांनी वाहनांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घातला होता. आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती. तर आणीबाणी मागे घेतल्यानंतर पंतप्रधान ट्रुडो म्हणाले की, ‘आम्हाला विश्वास आहे की सध्याचा कायदा लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसा आहे.’ पंतप्रधान ट्रुडो यांनी ९ दिवसांपूर्वी कॅनडात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत कॅनडाच्या इतिहासात दुसऱ्यांदा अशा पद्धतीने आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणीबाणीबाबत संसदेत प्रस्ताव प्रलंबित होता, त्याआधीच पंतप्रधान ट्रुडो यांनी आणीबाणी मागे घेण्याचा निर्णय घेतला.