कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या राज्याला मनरेगा आणि पंतप्रधान आवास योजनेसाठी केंद्राकडून निधी मिळालेला नाही, अशी तक्रार केली आहे. तसेच आपण यात जातीने लक्ष घालून केंद्राने थकवलेला निधी लवकरात लवकर पश्चिम बंगालला मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.
मुख्यमंत्री ममता यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘आपल्याला माहित आहे, मनरेगाची मजुरी हे ग्रामीण लोकांच्या उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन कायद्यानुसार, पंधरा दिवसांच्या आत ही मजुरी देणे अनिवार्य असते. मात्र पश्चिम बंगालमध्ये चार महिन्यांहून अधिक काळापासून मनरेगाची मजुरी देता आलेली नाही, कारण केंद्राकडून राज्याला ६,५०० कोटी रुपयांचा निधी येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच पंतप्रधान आवास योजनेत पश्चिम बंगाल देशात प्रथम क्रमांकावर आहे. २०१६-१७ पासून राज्यात ३२ लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, आता या योजनेसाठी राज्याला दिलेला निधी केंद्राकडून रोखण्यात आला आहे. परिणामी ग्रामीण भागातील विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे या योजनेचे महत्त्व आणि सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन आपण याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा आणि संबंधित मंत्रालयाला अधिक विलंब न करता थकवलेला निधी पश्चिम बंगालला जारी करण्याबाबत निर्देश द्यावे’, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील साऊथ ब्लॉक येथील निवासस्थानी त्यांनी हे पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता मोदी या पत्राला काय उत्तर देतात आणि पश्चिम बंगालला हा निधी कधी मिळतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.