मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज ईडी चौकशी सुरू असून त्यावरून आता राजकीय वर्तुळात चांगलाच सामना रंगला आहे. यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं असताना आता भाजप नेते ऍड. आशिष शेलार यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आपलं काम करत असून त्यांच्यावर दबाव का आणला जातोय असा सवाल शेलार यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत शेलार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. तसेच, नवाब बे नकाब हो गया है, असंही शेलार म्हणाले.
आशिष शेलार म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा एखाद्या देश हिताच्या मुद्यावर तपास करीत आहेत, त्यावेळी त्याचे उत्तर कायदेशीर मार्गाने देण्याचे सोडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तपास यंत्रणांवर दबाव का आणत आहेत? त्यांची बदनामी का करीत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि एनआयए गेल्या काही महिन्यांपासून अंडरवल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तांच्या व्यवहाराबाब चौकशी करीत आहेत. अशावेळी उत्तरे देता येत नाहीत म्हणून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष भाजपाच्या नावाने थयथयाट करीत आहेत. त्यांना जे काही बोलायचे ते न्यायालयात जाऊन बोलण्यासाठी अथवा जनतेच्या दरबारात बोलण्याचे दरवाजे खुले असताना, कायदेशीर मार्गाचा वापर न करता तपास यंत्रणांवर दबाव का आणला जातोय? तपास यंत्रणांचे खच्चीकरण का केले जाते आहे.?,बदनामी का करण्यात येते आहे? हे चुकीचे असून तपास यंत्रणांना आपले काम करु द्या विशेषतः देश हिताच्या मुद्यावर राजकारण करण्याची गरज नाही, आम्हीही करणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा जो तपास करीत आहेत त्यामध्ये सत्य समोर येईलच, असंही पुढे आशिष शेलार म्हणाले.
अंडरवल्ड डॉन दाऊदच्या मालमत्ता सरकारने ताब्यात घेऊन त्याबाबत पुढील कार्यवाही करणे अपेक्षीत असताना या मालमत्ता परस्पर विकल्या जात आहेत, त्यांचे हस्तांतर केले जात आहेत, यामध्ये मोठे व्यवहार होत असून यातून येणार पैसा कुठे वापरला जातोय?, आतंकवादासाठी तर हा पैसा वापरला जात नाही ना? याचा तपास तपास यंत्रणा गेले काही दिवस करीत असून यातील सत्य समोर येण्याची गरज आहे. दाऊदची बहिण हसीना पारकर, सरदार शहावाली खान, सलीम पटेल, इक्बाल कास्ककर ही नावे पुढे आली आहेत त्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये गेले काही दिवस समोर येते आहे. अशावेळी ज्या यंत्रणा तपास करीत आहेत त्यांच्यावर दबाव आणून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष या चौकशीमध्ये अडथळा आणण्याचे काम का कारीत आहे? असा सवालही आमदार अॅड आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. या सरकारच्या वागण्यातून नवाब बेनकाब हो गया है आणि आतकंवादी समर्थक ठाकरे सरकारचा चेहरा समोर आला आहे, पर्दाफाश झाला आहे, अशी टीपणीही आमदार ऍड आशिष शेलार यांनी केली.
आतंकवादाला जात धर्म नसतो
कोणी मुस्लिम कार्यकर्ता असला की त्यात दाऊदचं नाव घेतलं जातं, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले की आतंकवादाला कोणताही जात धर्म नसतो हे ज्येष्ठ असलेल्या पवार साहेबांना माहिती आहेच.