संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

केजरीवालांना अपशब्द वापरणारे भाजपा नेते तेजिंदर बग्गा अटकेत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना आज पंजाब पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. एसएएस नगर पोलिसांत १ मार्च रोजी बग्गा यांच्या विरोधात लोकांना भडकवणे, नकारात्मकता पसरविणे, सोशल मीडियावरून अफवा पसरविणे याबाबत तक्रार दाखल झाली होती. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचाही तक्रारीत समावेश होता.

तेजिंदर यांचे वडील प्रीतपाल सिंह बग्गा यांनी पोलिसांनी आपल्यासोबत हाणामारी केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले, ‘सकाळी २ पोलीस घरी आले, जे अगोदरदेखील २-३ वेळा नोटीस घेऊन आले होते. त्यानंतर अचानक १०-१५ पोलीस घरात घुसले आणि त्याला (तेजिंदर) खेचून घेऊन जाऊ लागले. हा व्हिडीओ घेण्यासाठी मी फोन उचलला तर मला खोलीत घेऊन गेले, माझा फोन घेतला आणि तेजिंदरचा फोनही घेऊन गेले. इतकेच नाही, तर त्यांनी माझ्या चेहऱ्यावर बुक्का मारला आणि बोलत होते, अरविंद केजरीवालांना हत्येची धमकी दिली आहे’, अशी प्रतिक्रिया प्रीतपाल सिंह बग्गा यांनी दिली.

तर पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बग्गा यांना पाच वेळा नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र ते जाणूनबुजून हजर राहिले नाहीत. मग कायद्याचे पालन करून आज सकाळी त्यांना त्यांच्या घरून अटक केली. आता एसएएस नगर पोलिसांच्या एसआयटीकडून पुढील चौकशी करण्यात येईल.

दरम्यान, बग्गा यांच्या विरोधात डॉक्टर सनी सिंह यांनी तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पंजाब पोलीस त्यांचा शोध घेत होते. ‘द कश्मीर फाईल्स’वर केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बग्गा यांनी अपशब्द वापरले होते. त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना काश्मीर पंडित विरोधी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात पंजाबमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तेजिंदर बग्गा यांनी याआधीदेखील अनेकदा वादग्रस्त ट्वीट केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, आजच्या अटकेवर दिल्ली भाजपाचे प्रवक्ता प्रवीण शंकर कपूर यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबमध्ये मिळालेल्या सत्तेचा राजकीय गैरवापर करत आहेत. सत्तेचा वापर ते विरोधकांना धमकावण्यासाठी करत आहेत. दिल्लीचा प्रत्येक नागरिक बग्गा यांच्या कुटुंबासोबत उभा असल्याचे कपूर यांनी म्हटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami