केरळ : केरळच्या कन्नूर जिल्ह्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला आहे. पय्यानुरमध्ये असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकला अशी माहिती पय्यानुर पोलिसांनी दिली आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. बॉम्ब हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या हल्लाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या हल्ल्यात जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच फर्निचरचेही नुकसान झाले आहे.
या घटनेवर भाष्य करताना भाजपचे टॉम वडाक्कन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे.आरएसएसचे कार्यालयापासून पोलीस स्टेशन १०० मीटर अंतरावर असून असे हल्ले कसे होतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील कोणत्याही राजकीय कार्यालयाचे नुकसान झाल्यास राज्य सरकारला जबाबदार धरले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून कम्युनिस्ट पक्ष आणि आरएसएस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. अशा घटना वारंवार घडल्यामुळे देशपातळीवर या घटनेमुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.